कुंभोज प्रतिनिधी :विनोद शिंगे
अतिग्रे – संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सन 2024 च्या सीबीएसई क्लस्टर IX ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन दि 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर यादरम्यान करण्यात आले आहे. सलग 9 व्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला मिळाला आहे.
महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमन येथील 150 पेक्षा अधिक सीबीएसई शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. 1500 पेक्षा अधिक खेळाडूंची नावनोंदणी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाच्या पत्रकार परिषदेत बोलताना संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती म्हणाल्या, “उत्कृष्ट नियोजनामुळे सलग नवव्या वर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला मिळाला आहे. सीबीएसईने दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या राहण्याची व जेवणाची उत्कृष्ट सोय करण्यात आलेली आहे. सीबीएसईने नियुक्त केलेले सर्व पंच व निरीक्षक स्पर्धेच्या दरम्यान मैदानावर उपस्थित असणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दि 4 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक चॅम्पियन रिया पाटील, संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, यांच्या उपस्थित सायंकाळी चार वाजता शाळेच्या मैदानावर संपन्न होणार आहे. 14, 17 व 19 या वयोगटात मुले व मुली अशा गटात या सर्व स्पर्धा पार पडतील. खेळाडूंसाठी मैदानाचेही उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. चेअरमन संजय घोडावत यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शन व सहकार्याबद्दल त्यांचेही आभार सस्मिता मोहंती यांनी मानले. या पत्रकार परिषदेसाठी बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ एच एम नवीन, प्राचार्य नितेश नाडे, प्राचार्य श्री अस्कर अली, क्रीडा संचालक विठ्ठल केंचनावर हे उपस्थित होते.