फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीच्या त्रासाला कंटाळून झाडाला गळफास लावून हॉटेल कामगाराने आत्महत्या

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुलीच्या त्रासाला कंटाळून झाडाला गळफास लावून हॉटेल कामगाराने आत्महत्या केली. मधुकर श्रीपती मोरे (वय 52, रा. जामदार गल्ली, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. याबाबतची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ चिठ्ठी मिळून आली असून पोलीस तपास करत आहेत.

 

 

मधुकर मोरे हे मूळचे खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील असून कामानिमित्त ते 30 वर्षांपूर्वी इचलकरंजीत आले हेते. सध्या ते नदीवेस नाका परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करत होते. सोमवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चिंचेच्या झाडाला मोरे यांचा मृतदेह लटकत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. याची माहिती मिळताच गावभाग पोलिसांनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना पंचनामा करताना त्यांच्या पँटच्या खिशात सुसाईड नोट मिळाली. त्यामध्ये मोरे यांनी फायनान्स कंपनीकडून 2 लाखांचे कर्ज घेतले होते. पुरामुळे काम बंद असल्याने त्यांचा कर्जाचा हप्ता चुकला होता. कर्जवसुलीच्या त्रासामुळे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.