अपघाताआधी अल्पवयीन चालकाने पबमधे जाऊन उडवले ४८ हजार रुपये

पुण्यामध्ये शनिवारी रात्री अल्पवयीन चालकाने महागडी पोर्श गाडी चालवून अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ट यांना धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यासह राज्यभर उमटताना दिसत आहे. तसेच या प्रकरणात नवनवी माहिती रोज समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पुण्यातील नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह अपघाताआधी दोन पबला भेटी दिल्या होत्या. त्यापैकी एका पबमध्ये ते ९० मिनिटे थांबले होते. केवळ दीड तासात अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी ४८ हजार रुपये उडवले होते.

अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी शनिवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी कोझी पबमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांनी ९० मिनिटांत ४८ हजार रुपयांचे बिल केले. तिथून ते १२ वाजून १० मिनिटांनी ब्लॅक मॅरियट या दुसऱ्या पबमध्ये गेले. आम्ही कोझी पबमधून ४८ हजारांचे बिल घेतले आहे. अल्पवयीन चालकाला अपघाताच्या काही तासानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा न्यायवैद्यक चाचणी अहवाल येणे बाकी आहे.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.

या प्रकरणात आम्ही आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३०४ (अ) कलम दाखल केलेले नाही. तर ३०४ हे कलम लावले आहे. मद्यपान केल्यानंतर एका अरुंद रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या मृत्यूसाठी आपण कारणीभूत ठरू शकतो, हे माहीत असूनही सदर अल्पवयीन चालकाने हे कृत्य केले आहे.  की, अल्पवयीन चालकाने दोन पबमध्ये जाऊन मित्रांसह मद्य पिले होते. त्यानंतर महागडी पोर्श कार चालवली. याबाबतचे सीसीटीव्ही चित्रण आमच्याकडे आहे. यामध्ये पबमध्ये आरोपी आणि त्याचे मित्र मद्य पिताना दिसत आहेत. सहायक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सागंतिले आहे.

पुणे पोलिसांनी अल्पवयीन चालकाचे वडील आणि नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही पबमधील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पबचालकांनी अल्पवयीन व्यक्तीला मद्य पुरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असे संकेत दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांनीही आरोपींवर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पोलिसांवर काही दबाव आहे का? या प्रश्नावर बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, आम्ही कायद्याप्रमाणे कारवाई करत आहोत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही.