घरातच थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर छापा

कोल्हापूरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरातच थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. पाच महिन्यानंतर या गुन्ह्यातील तीन एजंटना करवीर पोलिसांनी अटक केली. संबंधितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

मुख्य सूत्रधार स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याचा यापूर्वी मुरगुड आणि राधानगरी येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभाग होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.प्रदीप बाजीराव कोळी (वय ४२, रा. वळीवडे, ता. करवीर), पंकज नारायण बारटक्के (वय ३३, रा. सुलोचना पार्क, कोल्हापूर) आणि निखिल रघुनाथ पाटील (वय ३०, रा. धामणवाडी, ता. राधानगरी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. हे तिघे एजंट असून, त्यांनी गर्भलिंग निदानासाठी ग्राहक शोधून ते बोगस डॉक्टर पाटील याच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.मुलगा होण्याचे औषध देण्याचा दावा करण्यासह अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटची व्याप्ती वाढत आहे. छाप्याची कारवाई केल्यानंतर करवीर पोलिसांनी टेक्निशियन अमित केरबा डोंगरे (वय ३३, रा. सुलोचना पार्क) आणि एजंट कृष्णात आनंदा जासूद (वय ३३, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील याला फुलेवाडी चौकात जेरबंद केले.यानंतर आणखी तीन एजंटना पोलिसांनी अटक केली. गेल्या दीड ते दोन वर्षांंपासून यांचे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय होते. मात्र, प्रत्येकी दोन ते तीनच रुग्ण तपासणीसाठी पाठवल्याची कबुली ते देत आहेत, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली. तर बोगस डॉक्टर पाटील याचा गेल्या वर्षी मुरगुड आणि राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अवैध गर्भलिंग निदान गुन्ह्यातही सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले आहे.