धैर्यशील माने इचलकरंजीत तळ ठोकून ; दिवसभरात घेतल्या मान्यवरांच्या भेटी गाठी

इचलकरंजी : लोकसभा निवडणूकीचा रंग जसा चढू लागला आहे. तशाच पध्दतीने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनीही जनसंपर्क वाढविण्यावर भर देण्याचे सुरु केले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी सकाळपासूनच इचलकरंजी शहरात वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला होता. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळे, संघटना, समाजबांधव महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेऊन आपल्या उमेदवारीचे समर्थन करत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन ते करत होते.

खासदार माने यांनी आज दिवसभरात वखारभाग, गुजराथी समाज, लिंगायत समाज, शहापूर म्हसोबा यात्रा, सांगली वेस परिसरात हनुमान मंदिर, आर. के. नगर, सांगली नाका व शांतीनगर कंजारभारट समाजबांधवांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत विठ्ठल चोपडे, रविंद्र माने, प्रकाश पाटील, रवी रजपुते, रवी लोहार आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना इचलकरंजी शहरात मला वाढता प्रतिसाद पाहता मी मोठ्या मताधिक्क्याने विजयी होईन असा विश्‍वास व्यक्त केला.

इचलकरंजी जवळील शाहपूर म्हसोबा यात्रेनिमित्त खा. धैर्यशील माने मंगळवारी दुपारी दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत मंदिरापर्यंत नेले. तेथे दर्शन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गुलालाचा वर्षाव करीत विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. शाहपूर परिसरातून उच्चांकी मताधिक्य देवू असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी त्यांना दिला.