मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीत सामील होण्याची चर्चा सुरू होती. राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.
आज अखेर राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात याबाबत मोठी घोषणा केली. राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना तयारी करण्याचे आवाहनदेखील केले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर मनसे मनसे महायुतीत सामील होऊन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. आज अखेर राज ठाकरेंनी त्या सर्व चर्चांवर सविस्तर भाष्य केले.
यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, मी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांशी आणि एकनाथ शिंदेशी बोललो. त्यांना सांगितले की, मला या वाटाघाटीत पाडू नका. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, मला राज्यसभा किंवा विधानपरिषद नकोय. या देशाला पुढे नेण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच, मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देशही दिले. राज ठाकरे म्हणाले, सर्व मनसैनिकांना एकच सांगतो. आगामी विधानसभेच्या कामाला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला जे मांडायचे असेल, ते मांडेल.
जे योग्य ते योग्यच..
माझ्यावर अनेकजण टीका करतात की, 2019 च्या निवढणुकीत मी भाजपचा विरोध केला होता. पण, मी जे योग्य त्याला योग्य बोललो, जे अयोग्य त्याला अयोग्यच बोललो. 2014 च्या निवडणुकीनंतर मला वाटले की, मी जो विचार करत होतो, तसा पाच वर्षात काहीच झाला नाही. मी आजही सांगतो, ज्या गोष्टी पटल्या नाहीत, त्या नाहीच. ज्या चांगल्या वाटल्या, त्याला चांगलं बोलणार आणि ज्या चांगल्या वाटल्या नाही, त्याला विरोध करणार. मी जेवढे टोकाचे प्रेम करतो, तेवढाच टोकाचा विरोधही करतो.