महिलाच सामाजिक विकासाच्या ख-या-खु-या भागीदार: अरुण डोंगळे

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने ताराबाई पार्क कार्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्त संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्या हस्ते संघाच्या महिला कर्मचाऱ्यांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ आणि दूध उत्‍पादक महिला यांच्‍यातील नाते अतुट आहे. समाज आणि सहकारी दुग्‍ध व्‍यवसायाच्‍या ख-या-खु-या भागीदार दूध उत्‍पादक महिला आहेत.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, जागतिक महिला दिन दरवर्षी ०८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस समाजातील महिलांच्या योगदानाला आणि कर्तृत्वाला जागतिक मान्यता देण्यासाठी आणि समाजात त्यांचा आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. महिलांचा सन्मान व आदर फक्त आजच्या दिवशी न करता तो कायम स्वरूपी करावा. आपल्या मुलांना देखील महिला, मुलींचा आदर करायला शिकवणे आवश्यक आहे. आजच्या युगात महिला घरापासून ऑफिसपर्यंत सर्व काही सांभाळत असतात आणि कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत मागे नाहीत. आपल्या आयुष्यात त्यांच्या या त्यागाचा आणि योगदानाचा मोठा वाटा आहे. आजच्या या दिवशी सर्वांनी मिळून महिलांचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचं रक्षण करण्याची शपथ घेऊया असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले.

यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, महिला नेतृत्व विकास प्रमुख निता कामत, सौ.छाया बेलेकर, डॉ.अश्विनी तारे, गीता मोरे, सुनिता कांबळे इतर सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.