कोल्हापूर: महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पट्टीच्या विलंब आकारामध्ये 50 टक्के सलवत योजना सुरु केली आहे.
1 ते 29 फेब्रुवारी 2024 अखेर पाणीबिलाची थकीत रक्कम एकरक्कमी भरल्यास विलंब आकारामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १ ते ३१ मार्च 2024 अखेर 30 टक्के सवलत देण्यात आली आहे.50 टक्के विलंब आकारातील सवलतीमुळे आत्तापर्यंत रु.2 कोटी 16 लाख 11 हजार 653 वसुल झाली आहे. पाणीपट्टी विभागास 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता 77 कोटी इतके उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार आजअखेर 38 कोटी 69 लाख 67 हजार इतकी वसुली झाली आहे. 50 टक्के सवलत योजनेअंतर्गत दिनांक 1 ते 20 फेब्रुवारी 2024 अखेर 7,516 कनेक्शनधारकांनी रु.2 कोटी 16 लाख 11 हजार 653 इतकी रक्कम भरली आहे. यामध्ये रु.14 लाख 2 हजार 202 इतक्या विलंब आकार माफ करण्यात आला आहे. यामध्ये रु.14 लाख 33 हजार 166 इतका विलंब आकार जमा झाला. तसेच 2 कोटी 1 लाख 78 हजार 487 इतकी थकीत पाणी बिलाची रक्कम जमा झाली आहे. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मिटर रीडर यांचेशी किंवा नजीकच्या नागरी सुविधा केंद्रास संपर्क साधावा. तसेच गुगल-पे, फोन-पे, पेटीएम इ. मोबाईल ॲपद्वारे तसेच ऑनलाईन सुविधेद्वारे रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तरी 50 टक्के सवलत योजनेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन महापालिकेस सहकार्य करुन नळ कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.