नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीतून ६३ कोटी कर जमा

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील सर्वच बांधकामांना महापालिकेच्या नगररचना विभागातून परवानगी देण्यात येते. महापालिकेच्या महसुलासाठी हा विभाग आर्थिकदृष्ट्या महत्वाचा व मोठा हातभार ठरत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली नगररचना विभागाकडून वेळोवेळी विविध कॅम्पचे आयोजन केले जात आहे. दि. १ एप्रिल २०२३ ते दि.१० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत या विभागाकडे बांधकाम परवानगीतून तब्बल ६३ कोटीहून जास्त कर जमा झाला आहे.

राज्य शासनाच्या नियमानुसार नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी ऑनलाईन पध्दतीने सुरू आहेत. त्यामुळे कराचा भरणाही ऑफलाईन आणि ऑनलाईन करण्याची सुविधा आहे. दि.१ एप्रिल 2023 पासून जानेवारी 2024 अखेर २१ कोटी रुपये ऑनलाईन पध्दतीने व ४२ कोटी रु. ऑफलाईन पध्दतीने महापालिकेकडे जमा झाले आहेत.

यामध्ये एप्रिलमध्ये ३ कोटी ४१ लाख, मेमध्ये २ कोटी ३७ लाख, जूनमध्ये ३ कोटी ५८ लाख, जुलैमध्ये २ कोटी २६ लाख, ऑगस्टमध्ये २ कोटी ४९ लाख, सप्टेंबरमध्ये ५ कोटी ९७ लाख, ऑक्टोबरमध्ये ६ कोटी ७२ लाख, नोव्हेंबरमध्ये ३ कोटी ८४ लाख, डिसेंबरमध्ये ५ कोटी ४४ लाख, जानेवारी 2024 मध्ये ६ कोटी २० लाख कर वसुली करण्यात आली आहे. उर्वरीत 31 मार्च पर्यंत या विभागाकडे आणखीन वसुली होणार असलेचे उपशहर रचनाकार रमेश मस्कर यांनी सांगितले. यामध्ये सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व्हेअर व कर्मचारी यांनी वसूलीसाठी परिश्रम घेतले.