कोल्हापूर येथे रविवारी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मैदान

कोल्हापूर: शिवछत्रपती महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक व राजर्षी शाहू छत्रपतींच्या १५० व्या जयंती वर्षाचा सुवर्णयोग साधत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे जंगी मल्लयुध्द होत आहे.

स्वराज्य केसरी २०२४ या मैदानाची सुरुवात रविवार, दि. ११ रोजी खासबाग मैदान येथे दुपारी ठिक २-०० वाजता होणार असून या मैदानास महाबली पैलवान हिंदकेसरी सतपाल हे प्रमुख उपस्थित असणार आहेत.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने युवराज संभाजी छत्रपती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने घेणेत येणाऱ्या या मैदानात प्रथम क्रमांक विजेत्यासाठी मानाची गदा व रोख मानधन ठेवले असून सर्वच सहभागी मल्लांना मानधन देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रथम क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षद सदगिर, पुणे भारत विरुद्ध पैलवान मेहदी इराणी-इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान यांच्यात होणार आहे.द्वितीय क्रमांकाची लढत महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील, पुणे भारत विरुद्ध पैलवान हादी इराणी -इराणचा आंतरराष्ट्रीय पैलवान यांच्यात होणार आहे.तीन नंबरची लढत राष्ट्रीय विजेता पैलवान पृथ्वीराज मोहळ विरुद्ध पैलवान लवप्रित खन्ना ,पंजाब आंतरराष्ट्रीय पैलवान यांच्यात होईल.७१ ते ८० किलो वजन गटात चोवीस लढती.६१ ते ७० किलो वजन गटात एकवीस लढती.५१ ते ६० किलो वजन गटात एकोणीस लढती.४१ ते ५० किलो वजन गटात सोळा लढती.३१ ते ४० किलो वजन गटात अठ्ठावीस लढती.२० ते ३० किलो वजन गटात सव्वीस लढती होणार आहेत. महिला पैलवानांच्या सहा लढती होणार आहेत.

यामध्ये प्रथम क्रमांकाची लढत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती पैलवान रेश्मा माने विरुद्ध हरियानाची आंतरराष्ट्रीय पदक विजेती पैलवान पिंकी यांच्यात होणार आहे. द्वितीय क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी २०२३-२०२४ विजेती पै.अमृता पुजारी विरूद्ध हरियानाची राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती पै.तन्नू रोहतक यांच्यात होणार आहे.या मैदानात एकूण १५० लढती होणार असून सर्वच पैलवानांना मानधन व सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.

या मैदानातील सर्व कुस्त्या निकाली केल्या जातील. कुस्त्यांचे परीक्षण करण्यासाठी तज्ञ वीस पंचांची नियुक्ती करणेत आली आहे.सदरील स्वराज्य केसरी कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी तसेच ज्येष्ठ जाणते मल्ल व वस्ताद यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि उपस्थित सहभागी सर्व पैलवानांचा आरोग्यविमा उतरण्यात येणार आहे.

सदरचे मैदान तमाम नागरिकांसाठी मोफत ठेवले असून सहकुटुंब या कुस्ती कलेचा आनंद घ्यावा असे आवाहन युवराज संभाजी छत्रपती वाढदिवस गौरव समिती यांच्या वतीने करणेत आले आहे.

🤙 8080365706