कुडित्रे प्रतिनिधी :दोनवडे येथील गोल्डन हॉटेलचे मालक चंद्रकांत आबाजी पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपींना खुपिरे येथील काही ठिकाणी फिरवण्यात आले. तसेच खुनाच्या आधी चार दिवस कुठे कुठे गेले याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) पोलिसांनी घेतली.
खुपिरे यवलुज मार्गावरील एका बियर बार मध्ये संशयित आरोपी जाधव याला नेण्यात आले. त्या बारमध्ये घटनेपूर्वी चार दिवस संशयित आरोपी दत्ता पाटील व सचिन जाधव येऊन मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या बारमधील सीसीटीव्हीचे फुटेज घेतले. जाधव याच्याबरोबर या खून प्रकरणात असलेले संशयित आरोपी दत्ता पाटील याला गुजरातकडे पोलीस घेऊन गेल्याची माहिती हाती आली आहे.या घटनेत वापरलेले रिव्हॉल्व्हर गुजरातमधून आणल्याची माहिती हाती आल्याने त्याला गुजरातला पोलीस घेऊन गेले आहेत.
दरम्यान याप्रकरणी आणखीन काही लोक आहेत का?याचाही पोलीस कसून तपास करत आहेत. तसेच गुजरात मध्ये रिव्हॉल्व्हर विक्री करण्याची टोळी या घटनेमुळे उघड होण्याची शक्यता आहे. सध्या या परिसरातील खाजगी सावकार व शेअर मार्केटमध्ये कार्यरत असलेले एजंट यांचे धाबे दणाणले आहे.
तसेच चंद्रकांत आबाजी पाटील यांचे कडून या दोघा आरोपींनी किती रक्कम घेतली. किती रक्कम उचलली? याचाही पोलीस तपास करीत आहेत. खाजगी सावकारी दराने मोठी रक्कम उचल केल्याने हा खुनाचा प्रकार घडल्याची चर्चाही परिसरात सुरू आहे.