कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले.
आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समिती मधून शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्याकामासाठी एक कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होत्या.
आमदार सतेज पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यात प्रचंड विकास काम केली आहेत. पोलीस निवासस्थान, करवीर तहसीलदार कार्यालयाची इमारत, फायरिंग रेंज अशी अनेक कामे सांगता येतील. आम्ही ज्या कामाचा पाठपुरावा केला आहे त्याची उद्घाटने आम्हीच करणार आहोत.
कोल्हापूरमध्ये इंनडोअर स्टेडियम नाही ही मोठी शोकांतिका आहे. इंनडोअर स्टेडियमसाठी दहा कोटीचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र त्याची ऑर्डर रद्द झाल्याची खंत आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
एकेकाळी कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेचे गौरवशाली वैभव असलेल्या शिवाजी स्टेडियमची आज दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे आमदार जयश्री जाधव यांनी पाठपुराव्यामुळे मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईन काम मार्गी लागले आहे. यापुढेही स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन आमदार पाटील यांनी केले.
क्रीडा परंपरेचा मोठा वारसा असणाऱ्या जाधव घराण्याची मी सून आहे. त्यामुळे शिवाजी स्टेडियमची झालेले दुरावस्था पाहून मन दुःखी होते. आंतरराष्ट्रीय आणि रणजी क्रिकेट सामन्यांनी गाजलेले शिवाजी स्टेडियम वाचले पाहिजे, स्टेडियमचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहेत असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेसचे औद्योगिक सेलचे प्रदेश सचिव व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय देवणे, गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर संजय शेटे, विक्रम जरग, आर. डी. पाटील, शिवसेनेचे हर्षजित सुर्वे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, विनायक फाळके, काका पाटील, सचिन पाटील, दिगंबर फराकटे, श्रीकांत माने, अमर समर्थ, युथ काँग्रेसचे दीपक थोरात, महेश कदम, राजू ठोंबरे, राजू कुरणे, फुटबॉल प्रशिक्षक शिवाजी पाटील, बाळासाहेब नचिते, मावळाचे उमेश पोवार, किरण अतिग्रे यांच्यासह फुटबॉल खेळाडू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
