‘ माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करा – जि. प. सीईओ संतोष पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा योजनेतंर्गत जिल्हयात माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानातून शाळेची गुणवत्ता वाढवून लाखोंची बक्षिसे मिळवण्याची संधी शाळांना मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी आज (बुधवार) पत्रकार बैठकीत दिली.

 या अभियानांतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळेमधील गुणवत्ता, सुविधा, पटसंख्या व अन्य उपक्रमांवरून मुल्यांकन केले जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील २ हजार ९३ शासकीय शाळा, १ हजार ५८५ खाजगी अशा एकूण ३ हजार ६७८ शाळा सहभागी झाल्या आहेत. सर्व शाळांनी हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ संतोष पाटील यांनी केले.

   यावेळी सीईओ पाटील म्हणाले, तालुका, जिल्हा, विभाग स्तर आणि राज्य स्तरावर यश संपादन करणाऱ्या शाळांना प्रत्येक स्तरावर लाखों रूपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. यामध्ये तालुकास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना अनुक्रमे ३ लाख, २ लाख व १ लाखांचे बक्षिस आहे. जिल्हास्तरावर अनुक्रमे ११ लाख, ५ लाख व ३ लाखांचे बक्षिस मिळणार आहे. विभागस्तरावर अनुक्रमे २१ लाख ११ लाख ७ लाखांचे बक्षिस आहे. तर राज्य स्तरावर अनुक्रमे ५१ लाख, २१ लाख आणि ११ लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे.

सीईओ पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबत अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, आरोग्य व स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देणे, अर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आदी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हे अभियान राबविले जाणार आहे.

शिक्षणाधिकारी शेंडकर म्हणाल्या, विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याला ६० गुण, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग याला ४० गुण असे १०० गुण अभियानांतर्गत राबविल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांचा विद्यार्थी आणि पालकांनी किमान १ हजार शब्दांमध्ये अभिप्राय सादर करणे आवश्यक आहे, केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर मुल्यांकन होणार आहे.
पुढील २५ दिवसांमध्ये या अभियानाचे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबवावेत.

इयत्ता ५ वी आणि ८ वी तील शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने जिल्हा राज्यात आघाडीवर आहे, त्याच पद्धतीने या अभियानातही जिल्हा यशस्वी होण्यासाठी सर्व पातळीवरील प्रयत्न महत्वाचे आहेत, असे सीईओ पाटील यांनी सांगितले.

🤙 8080365706