मुंबई : यूवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा मेळावा दक्षिण मुंबईत शनिवारी (६ डिसेंबर) रात्री पार पडला. या मेळाव्यातून आदित्य ठाकरे यांनी आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं.आदित्य ठाकरे यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या (ठाकरे गट) कार्यकर्त्यांमध्ये नवचैत्यन्य निर्माण करताना येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांना चितपट करण्याचा इशारा दिला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी ‘ही मुंबई आपली आहे आणि आपलीच राहणार’, असा निश्चय व्यक्त केला.
आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, संपूर्ण देशाचं दक्षिण मुंबईवर लक्ष असतं, संयुक्त महाराष्ट्राचा लढा इथे सुरू झाला, मोठमोठी कार्यालयं इथे होती. ही मुंबई देशाला चालवते आणि हीच भाजपची पोटदुखी आहे. गेल्या १० वर्षांत एक एक करून यांनी सगळं इथून बाहेर नेलंय. याला जबाबदार कोण हे आपल्याला महिती आहे. महाराष्ट्रावर अन्याय करायचा, असा त्यांचा कार्यक्रम दिसतोय. आपलं सरकार पाडून खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलं, इतर राज्यात असं केलंय का? हे सरकार तुमचं, सर्वसामान्यांचं आहे असं तुम्हाला वाटतं का?
सरकारच्या आकार्यक्षमतेवर आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला, यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक घेण्याची चर्चा चालू आहे. आता जाहिरातीमध्ये तेच-तेच लोक सगळीकडे दिसतील. परंतु, प्रत्यक्षात महाराष्ट्रात एक रुपयाची परकीय गुंतवणूक आलेली नाही. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आपल्याकडे तळेगावला येणार होता, एक लाख लोकांना रोजगार मिळणार होता.
हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण खोके देऊन सरकार पाडलं गेलं. एअरबस, मेडिकल डीव्हाईस पार्क, बलड्रग पार्क, टेस्लाही आता गुजरातला चाललीय. सिमेंट कंपनी, सबमरीन प्रकल्प असं सगळं गुजरातला चाललंय, मग महाराष्ट्रात काय? महानंदासुद्धा गुजरातला, ४० गद्दारही गुजरातला गेले. राज्यात महाराष्ट्रद्रोही सरकार आहे. बांधकाम व्यावसायिक शहराचे पालकमंत्री झाले आहेत आणि महानगरपालिकेत जाऊन बसतायत.
भ्रष्टाचारावरून सरकारला इशारा देत आदित्य ठाकरे म्हणाले, घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रत्येक ठिकाणी टेंडर खातात, ६ हजार ८० कोटींचा घोटाळा केला, हे मी ठामपणे आजही सांगतो. मुंबइचे आयुक्तदेखील या घोटाळ्यात आहेत. २०२४ मध्ये आपलं सरकार येणार आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते सगळे लोक तुरुंगात जाणार. या लोकांनी स्ट्रीट फर्निचरचा २६३ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.
कुंड्या घेणार पण झाडं कोणती लावणार हे यांना माहीत नाही. मी लोकयुक्तांना यासंदर्भात पत्र लिहिलंय, फेब्रुवारीत त्यावर तारीख दिली आहे. तिथे न्याय मिळेल. हे सरकार आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा केवळ खोके आणि धोक्यांचा अभ्यास आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीत घोटाळा केला आहे. आम्ही केलेल्या कामाचं उद्घाटन तरी करा, तर तेही करत नाहीत. आम्ही २०२४ हे वर्ष कधी येणार याची वाट पाहत होतो, हे वर्ष आलंय आणि आपणचं दिल्ली गाजवणार.
आदित्य ठाकरे म्हणाले, महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन बांधकाम व्यावसायिकांना विकायला निघाले आहेत. २२६ एकरचा भूखंड आहे. यापैकी ९० एकर घोड्यांच्या शर्यतीसाठी उर्वरित जागा बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातली जात आहे. परंतु, आम्ही त्या जागेवर बिल्डरांना घुसू देणार आहे. एक वीटही रचू देणार नाही.