कळे ते गगनबावडा प्रस्तावित रस्त्याच्या भूसंपादनासाठी ३९ कोटी ३० लाख रक्कमेस मंजुरी…

कोल्हापूर : कोल्हापूर ते तरळे या राष्ट्रीय महामार्गातील कळे ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्याच्या रस्ता कामाच्या भूसंपादनासाठी केंद्राकडून 39 कोटी 30 लाख रक्कमेस मंजुरी मिळाल्याची माहिती विधानपरिषदेचे गटनेतेआमदार सतेज पाटील यांनी दिली. या भूसंपादनासाठी त्वरित निधी मंजूर करण्याची विनंती आपण केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली होती अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

       कोल्हापूर ते तळेरे हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा व पुणे-बंगळूर या  दोन महत्वपूर्ण राष्ट्रीय महामार्गाबरोबर कोल्हापूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्हा मुख्यालये तसेच वैभववाडी व गगनबावडा या दोन तालुका मुख्यालयांना थेट जोडतो. कोल्हापूर ते तळेरे या प्रस्तावित रस्त्याच्या कामाचे तीन टप्पे असून त्यातील पहिला कळे ते कोल्हापूर व तिसरा तळेरे ते गगनबावडा या दोन टप्प्यांचे काम सुरू झाले आहे. भूसंपादन अभावी कळे ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्याची काम ठप्प होते. कळे ते गगनबावडा या दुसऱ्या टप्प्याच्या कामामध्ये मोठमोठी वळणे आहेत. वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही वळणे काढणे गरजेचे आहे. वळणांच्या भागात जमीन अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक होती आणि त्यासाठीचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग विभागाने नवी मुंबई येथील क्षेत्रीय कार्यालयात सादर केला होता. वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदरचा रस्ता वेळेत पूर्ण होण्यासाठी या प्रस्तावास तातडीने मंजुरी देण्याचे विनंती मी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना २६ ऑगस्ट २०२३ रोजी सविस्तर पत्राव्दारे केली होती. त्यानुसार त्यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून कळे ते गगनबावडा या प्रस्तावित रस्त्याच्या भूसंपादनासाठी 39 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या मंजुरीमुळे या टप्प्यातील भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरुवात होणार असल्याचे सांगून निधी मंजुर केल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.