570 कोटींचा आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी सादर; माजी आमदार अमल महाडिक यांचा पाठपुरावा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मार्ग 29 आणि राज्यमार्ग 177 व 178 या एकूण 52 किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह अन्य सुधारणांसाठी प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी सल्लागार नेमणूक व्हावी अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी केली होती. त्यानुसार सल्लागार सेवा पुरवण्यासाठी मार्च महिन्यामध्ये 66 लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन प्रक्रियेस सुरुवात झाली होती. सदर रस्त्याच्या कामासंदर्भात सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर आज यासंबंधीचा आराखडा मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

569.59 कोटी रुपयांच्या या आराखड्यात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासह काँक्रिटीकरणावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग, या मार्गात असणाऱ्या तीन लहान पूलांची पुनर्बांधणी, 59 मोऱ्यांची तसेच 7 स्लॅब ड्रेनचीही पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या मार्गातील गावांमधून जाणारा रस्ता संपूर्णपणे कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे तसेच वीस गावांमध्ये गटारींचीही बांधणी करण्यात येणार आहे. 53 ठिकाणी जंक्शनची सुविधा,बस थांबे उभारणी, रस्त्याकडेला झाडे लावणे तसेच शौचालयांची उभारणी अशा विविध कामांचा या आराखड्यात समावेश आहे.

माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यामुळेच या आराखड्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही या रस्त्याच्या कामासाठी विशेष परिश्रम घेतले. लवकरच या आराखड्याला अंतिम मंजुरी मिळून निधीची तरतूद केली जाईल.

या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे करवीर आणि राधानगरी तालुक्यातील गावांना कोल्हापूर शहराशी जलद गतीने संपर्क साधता येणार आहे. तसेच दळणवळणाच्या दृष्टीने भविष्यकाळात या रस्त्याचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.रवींद्र चव्हाण यांचे आभार अमल महाडिक यांनी मानले. लवकरच प्रशासकीय मान्यतेने निधी वर्ग होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी आशा अमल महाडिक यांनी व्यक्त केली आहे.

🤙 9921334545