दोनवडे (प्रतिनिधी) : यशवंत बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बँकेच्या हितासाठी बिनविरोध निवडणूक करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत यासाठी सर्वतोपरी चर्चेला सहकार्य केले आहे. पण माघारीला दोनच दिवस बाकी असताना जर बिनविरोधला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर अमर पाटील व मी एकत्र येत बँकेच्या निवडणुकीत संस्थापक शंकरराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तगडे पँनेल उतरणार असल्याचे बँकेचे माजी अध्यक्ष अँड.प्रकाश देसाई यांनी सांगितले.
रविवारी शिंगणापूर येथे यशवंत बँकेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपली भूमिका मांडण्यासाठी बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देसाई बोलत होते यावेळी अमर पाटील,महेश पाटील,
माजी संचालक दिलिप खाडे,सुरेश रांगोळकर,कॅप्टन उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अँड. देसाई म्हणाले आम्ही बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सुकाणू समितीला सहकार्य केले आहे. जवळपास सहा सात बैठका झाल्या आहेत. पण यातून अजून तरी तोडगा निघालेला नाही. प्राथमिक चर्चेत अमर पाटील यांनी मांडलेले विचार बँकेचे स्थैर्य व हिताचे वाटल्यामुळे आम्ही दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आत सत्ताधारी गटाबरोबरही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करणार आहे. सत्ताधारी गटानेही दोन पावले मागे येत तडजोडीने बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले. बिनविरोधची चर्चा फिसकटलीच तर अमर पाटील व मी एकत्र येणार आहे.
अमर पाटील म्हणाले बिनविरोध निवडणूकीसाठी प्रयत्न सुरू आहेत.तडजोड झालीच नाही तर समविचारी असणारे सर्व गट बरोबर घेऊन निवडणुकीत उतरणार आहे. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,बाजार समिती माजी सभापती शामराव सुर्यवंशी हे आपल्या बरोबर येतील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी एम एस पाटील ,सतिश चौगले, दिपक चौगले ,भुषण पाटील, सुरेश करपे,अमित पाटील,दिपक माने, गोविंद चौगले,बाबासो पाटील, सरदार पिंजरे व सभासद उपस्थित होते. स्वागत कुष्णात चौगले तर आभार महेश चौगले यांनी व्यक्त केले.