व्हीएसआयच्या ज्ञानयाग ऊस प्रशिक्षणासाठी ‘शाहू’चे सभासद रवाना

कागल(प्रतिनिधी) : पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा व्हीएसआय पुणे या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या शिखर संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या ऊस शेती ज्ञानयाग प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी रवाना झाले.

ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढवण्यासाठी ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्हीएसआय मार्फत गत चौतीस वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. शाहू साखर कारखान्याच्या आज अखेर पुरुष ६७३ व महिला ४७४ अशा ११४७या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे.त्याचा ऊस शेतीमध्ये उपयोग करून उत्पादनात वाढ होण्यासाठी फायदा झाला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात व्हीएसआयचे शास्त्रज्ञ शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करतात.

शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्यामार्फत महिला व पुरुष सभासद शेतकरी या प्रशिक्षणासाठी पाठवण्याची परंपरा सुरू केली . त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली आहे. कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हे शेतकरी प्रशिक्षणासाठी रवाना झाले.

यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, शेती अधिकारी रमेश गंगाई, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव आदी उपस्थित होते.