शिवशाहीर डॉ.राजू राऊत यांच्या शिवभूपाळीने रसिक मंत्रमुग्ध

कोल्हापूर (प्रतिनिधी) शिवशाहीर डॉ. राजू राऊत यांच्या ‘शिवभूपाळी’ने रसिक श्रोते भारावून गेले. निमित्त होते रविवारी ‘अक्षर दालन’ येथे आयोजित ‘अक्षरगप्पा’च्या १०९ व्या कार्यक्रमाचे. यावेळी रविंद्र जोशी यांच्या हस्ते डॉ. राऊत यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल तर त्यांच्या पत्नी सुनीता राऊत यांचा यावेळी गीतांजली जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राऊत यांनी कोल्हापूरची ऐतिहासिक परंपरा, किल्ले पन्हाळ्यापासून ते शिवाजी पेठेपर्यंत अनेक घडामोडी, रंकाळा संवर्धनाचे आंदोलन याची सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, चरित्रे, पोवाडे, कवने लिहली गेली. परंतू त्यांच्यावर भूपाळी लिहली नव्हती. मला ही भूपाळी लिहण्याचे भाग्य मिळाल्याचे राऊत म्हणाले. कोल्हापूरचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी शाहीरांनाही रस्त्यावर उतरावे लागले असल्याचे सांगून त्यांनी चळवळींचीही माहिती यावेळी दिली.

राऊत म्हणाले, मी खरोखरच भाग्यवान आहे. लता मंगेशकर, रविंद्र मेस्त्री, बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर, मु. गाे. गुळवणी, गोविंद पानसरे यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील दिग्गजांचा मला सहवास लाभला. व्यक्तीस्तुती करणारे पोवाडे आपण कधीच लिहिले नसून शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांच्यासारख्या महापुरूष आणि स्त्रियांच्या कर्तबगारीला सलाम करणारे पोवाडे मी लिहिले आहेत. चिमासाहेब यांनी कोल्हापूर संस्थानमध्ये ब्रिटीशांविरोधात बंड केले होते. परंतू त्यांना कराचीत बंदी करून ठेवले. तिथेच त्यांचा अंत झाला. या दुर्लक्षित इतिहासाबद्दल काव्य लिहिले असून कादंबरी लिहण्याचाही मानस आहे.

समीर देशपांडे यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना बाेलते केले. यावेळी राम देशपांडे, प्रा. शशिकांत चौधरी, रमेश पोवार, संभाजीराव जगदाळे, जीवन बोडके, प्रा. मधुकर पाटील, रविंद्र अष्टेकर, अशोक भोईटे, रजनी हिरळीकर, अरविंद राणे, उमेश नेरकर, रामचंद्र टोपकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.