आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजालाच ; छगन भुजबळांचा दावा..

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षणाचा विषय आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात जात असताना ओबीसी समाजाने एल्गार मोर्चे घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापू लागले आहे.असे असताना हुशार असूनही आरक्षण नसल्याने कमी क्षमतेच्या लोकांच्या हाताखाली काम करावे लागत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. यावर आज हिंगोलीतील एल्गार मोर्चामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षणातून मिळालेल्या सरकारी नोकऱ्यांची टक्केवारीच जाहीर केली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण नाही असे म्हणताय परंतू आरक्षणाचा सर्वाधिक फायदा हा मराठा समाजालाच झाल्याचा दावा भुजबळांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या १० टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणात ८५ टक्के जागा या मराठा समाजालाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. आयएएसमध्ये १५.५० टक्के, आयपीएसमध्ये २८ टक्के अधिकारी हे मराठा आहेत. 

आरक्षण सोडून उरलेल्या ४० टक्के जागांमध्येही मराठा समाजाचे अधिकारी, आमच्या २७ टक्के ओबीसीमध्येही मराठा समाजाचे अधिकारी असा डबल फायदा मराठा समाजाला झाला आहे. यातून हेच सिद्ध होतेय की आरक्षण नसतानाही मराठा समाजाला सर्वाधिक फायदा होतोय, असा आरोप भुजबळांनी केला. 

मराठा समाजाला लोकसेवा आयोगातील प्रतिनिधित्व ए ग्रेड – 33.50 टक्के, बी ग्रेड – 29 टक्के, सी ग्रेड – 37 टक्के, डी ग्रेड – 36 टक्के एवढे मिळाले आहे. तर IAS – 15.50 टक्के, IPS – 28 टक्के आणि IFS – 18 टक्के अधिकारी हे मराठा आहेत. मंत्रालय कॅडरमध्ये ए ग्रेड – 37.50, बी ग्रेड – 52.30, सी ग्रेड – 52, डी ग्रेड – 55.50 टक्के एवढ्या जागा मिळाल्या आहेत. याचबरोबर गेल्या वर्षभरातील ६५० नियुक्त्यांपैकी ८५ टक्के नियुक्त्या या मराठा समजाच्या उमेदवारांना मिळाल्याचा दावा भुजबळांनी केला आहे.

मराठा समाजाला मिळालेला निधी…

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून 70 हजार लाभार्थ्यांना 5160 कोटी रुपये देण्यात आले. राजर्षी शाहू महाराज शिष्युवृत्ती, पंजाबराव देशमुख महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला 10,500 कोटी रुपये देण्यात आले आहेत, असा दावा भुजबळ यांनी करताना ओबीसींना अद्यापही तेवढा निधी मिळाला नसल्याचा दावा केला.