बिद्रित केपींच्या विरोधात ए वाय पाटील…

 

कोल्हापूर : बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधात खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व बिद्रीचे विद्यमान संचालक ए वाय पाटील, समरजीतसिंह घाटगे यांनी एकत्रित पॅनेलची बांधणी केली आहे. या साऱ्या नेत्यांनी एकत्र येत गुरुवारी (१६ नोव्हेंबर) सायंकाळी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली व राजर्षी छत्रपती शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीची घोषणा केली. शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी विरोधी पॅनेलची घोषणा करण्यात येणार आहे.

 निवडणुकीत यंदा परिवर्तन निश्चित होणार असा विश्वास यावेळी या नेते मंडळींनी व्यक्त केला. सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार के पी पाटील यांच्या विरोधात नेत्यांनी एकत्रितपणे केलेल्या आघाडीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांची साथ मिळाली आहे. तसेच गेली पाच वर्ष आमदार के पी पाटील यांच्यासोबत कारखान्यात सत्तेत सहभागी असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व शाहू उद्योग समूहाचे समरजितसिंह घाटगे हेही विरोधी आघाडीमध्ये सामील झाले आहेत.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ” भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवणार आहोत. कारखान्यामध्ये परिवर्तन निश्चित आहे.”खासदार संजय मंडलिक म्हणाले, “, निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आमचा प्रयत्न होता मात्र सत्ताधारी मंडळीकडून प्रतिसाद मिळाला नाही. चार तालुक्यातील ऊस उत्पादक सभासदांच्या हितासाठी परिवर्तन पॅनेलची उभारणी केली आहे. यंदा कारखाना निवडणुकीमध्ये निश्चितच बदल घडेल.” समरजीतसिंह घाटगे म्हणाले, ” 2005 मध्ये सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंग घाटगे हे दोन्ही नेते एकत्र आले होते. त्यावेळी कारखान्यांमध्ये परिवर्तन घडले होते. त्यानंतर यंदा संजय मंडलिक व आम्ही एकत्र येत आहोत कारखान्यांमध्ये निश्चितच बदल होईल.

 सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सगळेजण एकवटले आहेत कारखान्यांमध्ये पारदर्शक कारभार करण्यासाठी आमचा प्राधान्यक्रम राहील. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तयार झालेले पॅनल म्हणजे हे एक ट्रेलर आहे. अभी तो पिक्चर बाकी आहे अशी स्थिती आहे. येत्या २४ तासांमध्ये आणखी अनेक जण परिवर्तन पॅनमध्ये सहभागी होतील. “राष्ट्रवादीचे नेते ए. वाय‌. पाटील म्हणाले, “परिवर्तन आघाडीमुळे यंदा कारखाना निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल. मी परिवर्तन पॅनल सोबत आहे.

“पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक, मारुती जाधव, बाबासाहेब हिंदुराव पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, नंदकुमार ढेंगे, बाबा नांदेकर, शेतकरी संघाचे सुरेश देसाई, अरुण जाधव आधी उपस्थित होते.