जन्मानं दिलेली जात मी कधीही लपवत नाही : शरद पवार

मुंबई: जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही, सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या जातीच्या दाखल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “गेली 50 वर्षही पद्धत्त आहे. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष वेगळं आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी लोक येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही आधीच येऊन भेटून जातो.

आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी अलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचं वैशिष्ट्य. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन.”मराठा आरक्षणाबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करू, असं म्हणत शरद पवारांनी मराठा समाजाला आश्वासनही दिलं आहे.

पुढे बोलताना मराठा ओबीसीत वाद नाही, मात्र काही लोक तसं वातावरण तयार करत आहेत. लोकांचे न्याय प्रश्न मात्र सुटले पाहिजेत, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते होते. आरक्षणाच्या पुर्ततेची प्रक्रिया पुर्ण करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले असल्याचंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.