पुन्हा संधी नाही…एकजुट व्हा,अन् आंदोलनात सहभागी व्हा : सुरेशदादा पाटील

इचलकरंजी : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पुनश्‍च एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न अद्यापही सुटलेलला नसून केवळ आश्‍वासनांशिवाय काहीच मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकजुट होऊन सामील व्हावे. मराठा आरक्षणासाठी सातत्याने झटणार्‍या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षसुध्दा सहभागी होत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पुढार्‍यांना गावबंदी आणि गावागावात साखळी उपोषण सुरु करण्यात यावे, असे आवाहन महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

ते म्हणाले, मराठा आरक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. मराठा समाजाचा 50 टक्के ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी रास्त असून त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची सातत्याने मागणी आहे. त्यासाठी मागील 20 वर्षापासून विविध मार्गाने आंदोलने करण्यासह राज्य शासनाला लेखी स्वरुपातील अनेक निवेदने देण्यात आली आहेत. मात्र शासनाकडून केवळ वेळकाढूपणा आणि चालढकलपणा केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी सातत्याने आंदोलन केली जात आहेत. या आंदोलनाचा उद्रेक होत असून अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणासाठी चाललेले आंदोलन दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु हे आंदोलन आता थांबणारे नाही. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण भागात महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाच्या वतीने पुढार्‍यांना गावबंदी आणि साखळी उपोषण करण्यात येईल. त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी येथेही लवकरच साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे सांगत आता मराठा समाजाचे आंदोलन सरकारला पेलवणारे नसून सकल मराठा समाजाने साखळी उपोषण हे शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहनही सुरेशदादा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

🤙 9921334545