दुसरा हप्ता दिल्या शिवाय कुंभीने हंगाम सुरू करू नये : राजू शेट्टी

कुडित्रे ( प्रतिनिधी ) : ज्यावेळेस साखर उद्योग संकटात असतो तेंव्हा साखर कारखानदार केंद्र सरकार अथवा राज्य सरकारकडे पाठपुरावा करून धोरण ठरविण्यास असमर्थ असून ईडी , सीबीआय व इनकम टॅक्स विभागाच्या धास्तीने सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी शेतक-यांचाच बळी घेऊन मुग गिळून गप्प बसतात. देशातील सर्वात जास्त महसूल देणा-या साखर उद्योगाकडे कारखानदार व सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या आक्रोश पदयात्रेचे आज कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यावर दुसरा हप्ता दिल्याशिवाय कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करू न करण्याबाबतचे निवेदन कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांना देण्यात आले. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की राज्यातील साखर कारखाने आपल्या सोईप्रमाणे मार्च अखेर शिल्लक असलेल्या दर दाखविले असून अनेक कारखान्यांनी मनमानी पध्दतीने साखर विक्री केली आहे. प्रक्रिया खर्च अवास्तव दाखविला आहे यामुळे कारखान्यासह कर्जाचा बोजा वाढल्याने त्याचा फटका ऊस उत्पादक शेतक-यांना बसत आहे.

राज्यातील अनेक साखर कारखाने एफ आर पी पेक्षा जादा दर देत आहेत मात्र कोल्हापुर जिल्ह्यातील कारखान्यांची रिकव्हरी एक ते दिड टक्के जास्त असूनही दराबाबत मात्र तीनशे ते चारशे रुपयाने मागे आहेत.गेल्या पाच वर्षात ऊस उत्पन्नात प्रतिटन सातशे रूपयाहून अधिक वाढ झालेली आहे व एफ आर पी मात्र १०० रूपयांनी वाढली असून प्रतिटन ६०० रूपये ऊस उत्पादक शेतकरी तोट्यात आहे.

काटामारी , रिकव्हरी चोरी यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे यावर्षी ४०० रूपयाचा दुसरा हप्ता ४०० रूपये दिल्याशिवाय हंगाम चालू होवू देणार नसल्याचे सांगितले.दरम्यान कुंभी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रदीप नरके यांनी स्वाभिमानीच्या मोर्चाचे निवेदन स्विकारले. यावेळी बोलताना चंद्रदीप नरके म्हणाले की आम्ही सरकारकडे वारंवार मागणी करून साखर ४१ रूपये प्रतिकिलो करण्याची मागणी केली आहे.

शेजारच्या कर्नाटक राज्यातील कारखाने सुरू होत आहेत. यामुळे सीमाभागातील कारखान्यावर याचा परिणाम होणार नाही याची शासनाने काळजी घेऊन याबाबत तोडगा काढण्याची मागणी केली. यानंतर डी.वाय.पाटील सहकारी साखर कारखान्याचे शेती कार्यालय येथे कारखाना प्रतिनिधींना निवेदन देण्यात आले.

🤙 9921334545