नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा चेहरा ठरलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करणे चांगलेच भोवले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी छगन भुजबळ यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जयदत्त होळकर भुजबळांचे खंदे समर्थक होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भुजबळांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे भुजबळांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
जरांगेवरील टीकेमुळे भुजबळांचे मराठा समर्थक हळूहळू त्यांच्यापासून दूर होत आहेत. आता नाशिक येथील पदाधिकारी असणारे जयदत्त होळकर यांनी त्यांची साथ सोडल्यामुळे त्यांची मोठी दमछाक होण्याची शक्यता आहे.
जयदत्त होळकर राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढेच नाही तर निफाड तालुका पूर्व 46 गाव तालुकाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला आहे. मी आता केवळ मराठा समाजासाठी काम करण्याची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाचा झेंडा हाती घेतला आहे, असे होळकर यासंबंधी बोलताना म्हणाले.
