अंध बंधू-भगिनींना उद्या ‘पांढरी काठी’चे वितरण, जनजागृती फेरी, सत्काराचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जगभरामध्ये अंध दिन व जागतिक पांढरी काठी दिन हा दिवस १५ ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो. याचे औचित्य साधून राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने उद्या, रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यालीतील २०० पेक्षा जास्त अंध बंधू-भगिनींना ‘पांढरी काठी’चे वितरण व बिंदू चौकातून जनजागृती फेरी तसेच यशस्वी गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रचे महासचिव शरद पाटील यांनी दिली.१५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक अंध दिन- पांढरी काठी दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो.

नियतीने डोळ्यातल्या प्रकाशज्योती हिरावून घेत ज्या अंध बांधवांचे आयुष्य अंधःकारमय करून टाकले आहे, त्या अंध बांधवांना अंधःकारमय जीवनातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र ही अंधांनी अंधांसाठी चालवलेली बिगर राजकीय सामाजिक संघटना असून गेली ४५ वर्षापासून अंधांचे शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार यासाठी कार्य करत आहे.

या संघटनेच्या सात विभागीय शाखा व जिल्हा शाखा आहेत. त्यातीलच कोल्हापूर जिल्हा शाखा ही २०२० पासून आपल्या कोल्हापूर जिल्हयामध्ये अंध बंधू भगिनींसाठी कार्य करत आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शाखेच्यावतीने उद्या, रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त अंध बंधू-भगिनींना ‘पांढरी काठी’चे वितरण व जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता बिंदू चौक येथून जनजागृती फेरी सुरु होणार आहे. तर शाहू मैदान, शिवाजी पेठ येथे जनजागृती फेरीचा समारोप होणार आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात जिल्ह्यातील २०० पेक्षा जास्त अंध बंधू-भगिनींना ‘पांढरी काठी’चे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी खतीब फायनान्स आणि साप्ताहिक अर्थराज्यच्यावतीने यशस्वी गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. संदीप पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते होणार आहे. तर उद्योजक पारस ओसवाल, हार्दिका वसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. जिल्हा शाखा कोल्हापूरचे पदाधिकारी, पुणे विभागीय शाखेचे महासचिव शिवाजी लोंढे यांचाय्श मान्यवर यावेळी उपस्थित उपस्थित असणार आहेत.