इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 चा मुकुट ‘कंटेंपररी किंग’ समर्पण लामाच्या शिरी!

मुंबई: सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर 3 या त्यांच्या स्वतःच्या फॉरमॅटने, त्यातील स्पर्धकांची प्रतिभा, डान्स फॉर्ममधील वैविध्य आणि दर्जेदार मनोरंजन यांच्या बळावर देशाला थिरकायला लावले आहे. या सीझनमध्ये देशातील काही अप्रतिम डान्सर्स या मंचावरून प्रेक्षकांच्या समोर आले आणि त्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले.

अखेरीस फिनाले नंबर 1 मध्ये टॉप 5 स्पर्धकांमधील अटीतटीच्या चुरशीनंतर समर्पण लामा हा स्पर्धक या सत्राचा विजेता ठरला. समर्पण लामाला 15 लाख रु बक्षिसाच्या रूपात मिळाले आणि इंडियाज बेस्ट डान्सर 3 चा प्रतिष्ठित करंडक त्याने पटकावला. त्याची कोरिओग्राफर भावना खंडुजा हिला 5 लाख रु. चा धनादेश बक्षिसाच्या रूपात देण्यात आला.या दिमाखदार सोहळ्यात बॉलीवूडचा हीरो नंबर 1 – गोविंदा तसेच ‘गणपत’ चित्रपटाचे कलाकार – टायगर श्रॉफ आणि कृती सेनन उपस्थित होते. या आमंत्रित पाहुण्यांनी होस्ट जय भानुशाली आणि परीक्षक सोनाली बेंद्रे आणि गीता कपूर यांच्यासह अंतिम फेरीतील 5 स्पर्धकांचे मनोबल वाढवले. अंतिम फेरीत पोहोचलेले हे पाच स्पर्धक होते- शिवांशु सोनी, विपुल खांडपाल, अनिकेत चौहान, अंजली मामगाई आणि विजेता ठरलेला समर्पण लामा.

‘सुपर डान्सर’मधील तडफदार मुले – फ्लोरिना गोगोइ, परी तमांग, तेजस वर्मा आणि अनीश तट्टीकोट्टा तसेच आगामी इंडियन आयडॉल सीझन 14 चे स्पर्धक वैभव गुप्ता, आथया मिश्रा आणि मुसकान श्रीवास्तव आणि होस्ट हुसैन कुवाजेरवाला यांच्या उपस्थितीने फिनाले नंबर 1 ची रंजकता आणखीनच वाढली.#हरमूव्हसेकरेंगेप्रूव्ह हे या सीझनचे थीम होते आणि समर्पणने मोठ्या प्रयासाने हा विजय मिळवला आहे. या शोमधील त्याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. ऑडिशनमध्ये तो चमकला होता आणि ऑडिशन फेरीतून ‘बेहतरीन 13’ मध्ये पोहोचणारा तो दुसरा स्पर्धक होता.

आपले स्वप्न साकार करण्याच्या मार्गातील त्याचे हे पहिले लक्षणीय पाऊल होते. त्याच्यातील मोहकता, डौलदार मूव्ह्ज आणि कंटेंपररी डान्स करताना तो जी जादू निर्माण करायचा, त्याबद्दल त्याला वेळोवेळी तिन्ही परीक्षकांकडून आणि शोमध्ये आलेल्या मान्यवर पाहुण्यांकडून प्रशंसा मिळत होती. सोनाली बेंद्रेने त्याला ‘क्यूटी मिनिस्टर’ असे सार्थ नाव दिले होते, तर त्याच्या पदन्यासाने वेडावून गीता कपूरने त्याच्या पावलावर ‘काला टीका’ लावला होता. ती असे देखील म्हणाली होती की तिला समर्पणमध्ये टेरेन्सची झलक दिसते. परीक्षक टेरेन्स लुईसने त्याचे ‘किंग ऑफ कंटेंपररी’ असे नामकरण केले होते.

प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाने त्याच्या प्रतिभेपुढे नतमस्तक होत त्याला शूज भेट दिले होते. समर्पणचा सर्वात जास्त लक्षात राहणारा परफॉर्मन्स होता ‘परम सुंदरी’ गाण्यावर त्याने स्त्रीवेशात केलेला डान्स! अतिथी म्हणून आलेल्या रवीना टंडनला हा परफॉर्मन्स फारच आवडला होता आणि तिने त्याला ‘मिस दिव्हा’ म्हणून संबोधले होते. याच मंचावर समर्पणची आपल्या वडिलांशी अनेक वर्षांनंतर भेट झाली, तो क्षण त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे करणारा ठरला.