नवी दिल्ली: लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूने 454 मतं पडली असून केवळ दोन खासदारांनी विरोधात मतदान केलं आहे.
महिला आरक्षण विधेयकाबद्दल बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.हे काळ बदलणारं विधेयक आहे असं गृहमंत्री अमित शाह म्हणाले.
“कालचा दिवस भारतीय संसदेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल. काल महिला आरक्षण विधेयक सादर झालं. मी नरेंद्र मोदींना अगदी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. माता भगिनींना सन्मानित करण्याचं काम त्यांनी केलं.
हे विधेयक संमत झाल्यावर संसदेत आणि विधानसभेत आरक्षण लागू होईल. कलम 239 AA मध्ये काही बदल घेऊन आले आहेत. 332A नुसार संसदेत एक तृतीयांश जागा आरक्षित होतील. याबरोबरच महिलांच्या संघर्षाला पूर्णविराम लागेल. आता धोरण ठरवण्यात महिलांचा सहभाग वाढेल.”
“काही पक्षांसाठी महिला सशक्तीकरण राजकीय अजेंडा होऊ शकतो, काहींसाठी तो राजकीय मुद्दा असू शकतो. काहींसाठी तो निवडणुकीचा मुद्दा असू शकतो. मात्र आमच्यासाठी तो नाही. हा मान्यतेचा प्रश्न आहे. जेव्हा मोदी पक्षात काम करायचे तेव्हा त्यांच्या पुढाकाराने भाजपमध्ये हे आरक्षण लागू झालं. जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंचा लिलाव करून ती रक्कम महिला आणि मुलींसाठी वापरली. जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा त्यांच्या पगारातून त्यांनी लहान मुलींच्या शिक्षणासाठी ते पैसे दिले,” ते पुढे म्हणाले.
बेटी बचाव आणि बेटी पढाओ या योजनेमुळे लिंगविषमता कमी झाली असं ते पुढे म्हणाले.आज कोणत्याही योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात जातो. काँग्रेस ने गरिबी हटावच्या घोषणा दिल्या मात्र त्यांनी साधं शौचालय नव्हतं. पहिल्या पाच वर्षात त्यांनी 11 कोटी शौचालयं बांधली. त्यामुळे महिलांचा सन्मान वाढला. 10 कोटी एलपीजी गॅस दिले. 3 कोटी महिलांना घरं दिली. 12 कोटी घरात पिण्याचं पाणी नव्हतं त्यामुळे महिलांना त्रास झाला. त्यांना नळाद्वारे पाणी देण्याचं काम मोदींनी केलं असं ते म्हणाले.