कागल प्रवेशद्वार रस्ता रुंदीकरण,व उड्डाणपूलामुळे कामास गती : राजे समरजितसिंह घाटगे

कागल : कागल शहर बस स्थानकाशेजारील रुंदीकरण करावयाचा रस्ता व या ठिकाणी उभाराव्याच्या पुलाची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह साईट पाहणी केली. कागल शहरात जाणारा रस्ता मोठा व्हावा व त्या ठिकाणी नॅशनल हायवे वर होणारा उड्डाणपूल कराडच्या धर्तीवर व्हावा यासाठी घाटगे यांनी मागील आठवड्यात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावर निवेदनावर गडकरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यामुळे या कामाला गती मिळेल अशी माहिती राजे समरजीतसिंह घाटगे यांनी दिली.

या सर्व्हे टीम मध्ये नॅशनल हायवे अथॉरिटीऑफ इंडियाचे महेश पाटोळे, रोडवेज कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प अधिकारी महादेव चौगुले,कन्सल्टींग विभागाचे विलास देशमाने,राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण विभागाचे वैभव पाटील यांचा समावेश होता.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारच्या विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कागल शहर व परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कागल शहरात रहदारीची मोठी समस्या आहे.

कागल शहरालगत असणारे विविध कारखाने, दूध संघ, फाईव्ह स्टार एमआयडीसी,शासकीय कार्यालये, एसटी स्टँड व कागल शहरातील वाढती रहदारी यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागतो. वाढत्या औद्योगिकरणामुळे तसेच आसपास असणाऱ्या शाळा- महाविद्यालयांमुळे खूप दुर्घटनाही घडत असतात. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात तयार होणारा उड्डाणपूल भराव टाकून न होता कराडच्या धर्तीवर करावा. व शहरात प्रवेश करणारा रस्ता मोठा करावा त्यामुळे रहदारीच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करुन व्यापा-यांचाही प्रश्न मिटणार आहे.

अशी मागणी घाटगे यांनी केली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, शाहूचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने, राजे बँकेचे संचालक उमेश सावंत, विवेक कुलकर्णी, युवराज पसारे ,हिदायत नायकवडी, रमीज मुजावर, पांडुरंग जाधव यांच्यासह व्यापारी, वडाप व्यवसायिक, व नागरिक उपस्थित होते.

विभागिय प्रमुखही करणार पाहणी

या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे रिजनल हेड अंशुमलू श्रीवास्तव यांचीही घाटगे यांनी मुंबई येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी स्वतः सिव्हिल टीम सोबत येऊन सर्वेक्षण करणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती यावेळी घाटगे यांनी दिली.