
कागल: येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार (ता.१८) ते सोमवार (ता.२१)या दरम्यान भव्य मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली ही स्पर्धा आॕलंपिकच्या धर्तीवर सलग ३७व्या वर्षी होत आहेत. अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.

या कुस्ती स्पर्धा एकतीस विविध गटांमध्ये होतील. त्यामध्ये चौदा वर्षाखालील बाल व सोळा वर्षाखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी आठ गट तसेच एकोणीस वर्षाखालील ज्युनियर गटामध्ये सात व सीनियर गटामध्ये पाच वजनी गटामध्ये या स्पर्धा होतील.तसेच महिला कुस्तीगिरांसाठी 45,55 व 65 किलो अशा तीन वजनी गटांमध्ये स्पर्धा घेण्यात येतील.कारखान्याच्या मालकीच्या बंदिस्त गोदामात या स्पर्धा घेण्यात येतील.स्पर्धेच्या ठिकाणी येऊ न शकणाऱ्या कुस्ती शौकीनांना घरबसल्या या स्पर्धा पाहता येण्यासाठी कुस्ती हेच जीवन या फेसबुक पेजवरून ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात येणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.कारखाना कार्यक्षेत्र,कागल तालुका,गडहिंग्लज शहर,उत्तूर व कडगाव- कौलगे जिल्हा परिषद मतदार संघ मर्यादित मॅटवरील कुस्ती स्पर्धा होणार आहेत.
कारखान्याचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून उद्योन्मुख खेळाडूंना संधी मिळावी. या हेतूने राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त मॅटवरील कुस्ती स्पर्धा संपूर्ण ऑलिम्पिक पद्धतीने नियोजन करून भरवल्या जातात. विविध वजनी गटातील विजेत्या मल्लांना कारखान्यामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. कारखान्यामार्फत कागलचे आराध्य दैवत श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुसा निमित्त यशवंत किल्ला येथे भव्य कुस्ती मैदानात देशातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या भरविल्या जातात. तसेच कारखाना कार्यक्षेत्र व कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या कुस्ती मैदानसाठी अनुदान म्हणून आर्थिक मदत दिली जाते. कुस्तीसह इतर गुणवंत खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाते. यातील अनेक खेळाडू राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महान भारत केसरी व महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे विविध किताबांचा मानकरी अस्लम काझी,विक्रम कुराडे, रणजित नलावडे,कौतुक डाफळे, नंदकुमार आबदार,उत्तम मगदूम, भरत पाटील, मधुकर खामकर,विलास मोरे, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार विजेती धावपटू ज्योती जाधव, जयश्री बोरगी, स्केटिंगपटू सुजय पवार, पॉवर लिफ्टर शुक्ला बिडकर अमित निंबाळकर आदींचा समावेश आहे. कारखाना कार्यक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाबरोबर क्रीडा क्षेत्रावरही कारखान्याने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी कागल नगर परिषदेकडील राजर्षि शाहू क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करून तेथे अद्ययावत व सुसज्ज अशी श्रीमंत जयसिंगराव घाटगे व्यायामशाळा सुरू केली आहे. त्याचप्रमाणे शिंदेवाडी ता. कागल येथे पिराजीराव घाटगे व्यायाम शाळा व तालीम सुरू केली आहे.
या ठिकाणी आसपासच्या गावातील खेळाडू सराव करीत असतात .कारखाना कार्यक्षेत्र व कागल तालुक्यातील तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी. युवापिढी तंदुरुस्त व सशक्त व्हावी. या उदात्त हेतूने कारखान्याचे भाग विकास निधीतून विश्वस्त संस्थेमार्फत सार्वजनिक नोंदणी असणाऱ्या तरुण मंडळांना व्यायाम साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत करून आपल्या भागातूनच नवोदित खेळाडू तयार व्हावेत. याकरिता अशा योजना राबवल्या जात आहेत.श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या सर्वांगीण विकास व प्रगतीबरोबरच कार्यक्षेत्राच्या सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक व क्रीडा विकासाची बांधीलकी सातत्याने जपली आहे.राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती कलेला राजाश्रय दिला व कोल्हापूर जिल्हा कुस्ती पंढरी म्हणून ओळखू लागला. पुढे हाच लाल मातीचा वारसा त्यांचे वंशज स्व. राजे विक्रमसिंह घाटगें यांनी चालविला आणि लोप पावत आलेली कुस्ती भरभराटीस आली. ख-या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यात कुस्ती कला जिवंत ठेवण्यासाठी स्व. राजेंचे फार मोठे योगदान आहे. स्व. राजेसाहेबांच्या निधनानंतर हाच वारसा आणि वसा पुढे चालविण्याचे काम राजे समरजितसिंह घाटगे करीत आहेत. उच्चशिक्षीत चार्टर्ड अकौंटन्ट असलेल्या समरजितराजेंनी अल्पावधीतच जनमानसात कारखान्याबरोबरच क्रीडा क्षेत्राचा नावलौकीक वाढविला आहे.स्व. राजेंनी कारखाना कार्यक्षेत्र व कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र क्रीडा विभाग सुरू केला असून, समरजितराजेंनी आजही तो सुरू ठेवला आहे. या विभागामार्फत कार्यक्षेत्र, कोल्हापूर व महाराष्ट्रातील होतकरू, गुणी व उल्लेखणीय कामगिरी करीत असलेल्या उदयोन्मुख कुस्तीगीर व इतर खेळातील खेळाडूंना कारखाना व पिराजीराव घाटगे ट्रस्ट यांचेमार्फत दत्तक घेवून कारखान्याचे कोच मेहताना प्रतिनिधी यांच्यामार्फत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करून घेतली जात आहे. शिवाय दत्तक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून कारखाना व पीजीटी मार्फत दरमहा क्रीडा शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक मदत केली जात आहे.