नाशिक: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज, शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार उद्घाटन होणार आहे.
शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्याने नाशिक ते शिर्डी हे अंतर जलदगतीने पार करता येणार आहे. मात्र हे अंतर पार करताना नागरिकांना तीनदा टोल द्यावा लागणार आहे. 82 किमीच्या अंतरात तीन टोल नाक्यांचा समावेश आहे. शिर्डी ते भरवीर या 82 किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्यात 7 मोठे पूल, 18 छोटे पूल, वाहनांसाठी 30 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 23 भुयारी मार्ग, 3 टोल प्लाझावरील तीन इंटरचेंज, 56 टोल बूथ, 6 वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. पॅकेज क्र 11,12 आणि 13 चे इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचा खर्च 3200 कोटी रुपये एवढा असून लांबी 82 कि मी आहे. या दुसऱ्या टप्याच्या उद्घाटनानंतर 701 किमी पैकी आता एकूण 600 किमी लांबीचा समृध्दी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे.