आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून : सत्यजित जाधव

कोल्हापूर : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत कोल्हापुरातील सहा व सांगली, सातारा येथून प्रत्येकी एक असे एकूण आठ संघ सहभागी होणार असून स्पर्धा दि.२९ मार्च ते दि. २ एप्रिल या कालावधीत होणार असल्याची माहिती युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. सत्यजित जाधव म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे प्रसिध्द फुटबॉलपटू होते, हे सर्वज्ञात आहे. याचबरोबर ते एक चांगले क्रिकेटपटूही होते. क्रिकेटवरील प्रेमापोटी त्यांनी जशी फुटबॉलपटूंना मदत केली होती, तशी क्रिकेटपटूंनाही मोठी मदत केली आहे. शिवाय त्यांनी ज्या पद्धतीने फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या त्याच पद्धतीने क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ही इच्छा अपूर्ण राहिली. ती पूर्ण व्हावी म्हणून आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धेतील सामने शास्त्रीनगर येथील क्रिकेट मैदान व शिवाजी विद्यापीठातील मैदानात खेळवले जाणार आहेत. बुधवारी दि. २९ रोजी सकाळी ९ वाजता आमदार जयश्री जाधव व आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर अंतिम सामना 2 एप्रिल रोजी होणार असून, स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास 50 हजार व उपविजेता संघास 25 हजार रुपये व स्मृती चषक तसेच प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व मालिकावर असे वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले.शांद फाऊंडेशनचे मधू बामणे, अनिल शिंदे, राजू भोसले, विक्रम जाधव, विजय कोंडाळकर व आशिष पवार आदी उपस्थित होते.