‘रासणेंचा अर्ज मागे घेऊ’; चंद्रशेखर बावनकुळे

पुणे : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत सर्व पक्ष आपली ताकद लावताना दिसत आहेत. भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठेत पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. यामुळे टिळक कुटुंबियांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आले आहे. पुण्यातून याचे पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘दुपारी तीन वाजेपर्यंच मविआने निवडणूक बिनविरोध केल्यास रासणेंचा अर्ज मागे घेऊ’, असे सांगितले.

“कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध केल्यास मी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार आणि नाना पटोले यांचे आभार मानीन. परंतु, त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यास नकार दिला. त्यामुळे आम्हीही निवडणूक लढवणारच आहोत. जर तुम्ही निवडणूक बिनविरोध केली तर, आम्ही टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्यास तयार आहोत”, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.