पन्हाळगडाच्या ऐतिहासिक तटबंदी व टेहळणी बुरुजावरील बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी…

पन्हाळा : पन्हाळगडावर सि.स.नंबर 652 येथील विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमिनीत तसेच गडाच्या पुर्व बाजुच्या ऐतिहासिक तटबंदी व टेहळणी बुरुजावर बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी भारतीय दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन पन्हाळा तहसिलदार रमेश शेंडगे यांना सादर करण्यात आले आहे.पन्हाळगडावरील सि.स.नं 652 मधील डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमिनीत त्याप्रमाणे ऐतिहासिक तटबंदी व टेहळणीबुरुजावर एका खाजगी हाँटेल मालकाने बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले असल्याचे पन्हाळा महसुल,भुमिअभिलेख व पन्हाळा नगरपरिषद प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या शासकीय मोजणीद्वारे स्पष्ट झाले आहे.पन्हाळगडावर डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची  असणारी जमीन ही छ. शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्यातील  असणारा ऋणानुबंधाचा ऐतिहासिक पुरावा आहे.

अतिक्रमीत टेहळणी बुरुज व तटबंदीमध्ये छ.शिवरायांच्या गौरवशाली इतिहास दडलेला आहे.सदरच्या ऐतिहासिक ठिकाणी संबंधित हाँटेल मालकाने पर्यटक, इतिहास संशोधक, गाईड, इतिहास प्रेमी, विद्यार्थी यांना जाणेस मज्जाव केला असुन सदरच्या ऐतिहासिक बुरुजावर व तटबंदीवर राजरोसपणे गैरप्रकार घडत असुन सदरची भुमि कलंकित होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परिणामी भिमसैनिकांच्या व शिवप्रेमीच्या भावनांचा उद्रेक होवु लागला आहे.तरी शासनाने सदरच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करुन ऐतिहासिक जमिन व तटबंदीवर झालेले अतिक्रमण तात्काळ काढावेत असे या निवेदनात म्हंटले आहे. दरम्यान, सदरचे बेकायदेशीर अतिक्रमण न काढल्यास भारतीय दलित महासंघाच्या वतीने संबंधित अतिक्रमित हाँटेल गनिमीकावा पद्धतीने उद्धवस्त करणेत येणार असल्याचा सनसनीत इशारा प्रशासनाला दिला आहे.

या निवेदनाची प्रत माहितीसाठी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस प्रमुख, पोलिस निरीक्षक, पन्हाळा, मुख्याधिकारी पन्हाळा यांना देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले आहे.