जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

कोल्हापूर :  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी त्यांना जिल्हा परिषदेत अभिवादन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोल्हापूर केंद्र आणि जिल्हा परिषदेच्यावतीने या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.     यावेळी पत्रकार समीर देशपांडे यांचे पंचायत राज व्यवस्थेचे संस्थापक यशवंतराव  चव्हाण या विषयावर व्याख्यान झाले. गावपातळीवरच्या विकासाप्रक्रियेचे लोकशाहीकरण आणि स्थानिक नेतृत्वाला मोठया संधी देण्याचे काम चव्हाण यांनी घेतलेल्या पंचायत राज व्यवस्थेच्या निर्णयामुळे झाले.

चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्थेचा महाराष्ट्रात पाया घातला आणि महिला आरक्षणातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यावर कळस चढवला असे मत यावेळी देशपांडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राची राजकारण,समाजकारण, कला, क्रीडा. संस्कृती याची वाटचाल कशी असावा याची मांडणी चव्हाण  यांनी केली. भारत देशामध्ये महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजले जाते. त्याची पायाभरणी चव्हाण यांच्या पहिले मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामकाजात आहे असेही ते म्हणाले.    प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अशोक पोवार यांनी प्रास्ताविक केले तर रोहित पाटील यांनी आभार मानले.

जयश्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी व्ही. बी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्य पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख व्ही. एस. सांगावकर, समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे, विलास पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. योगेश साळे, पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. विनोद पवार, पदमजा तिवले, विनोद डुणुंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रमेश मोरे,  सीमा पाटील, डाॅ. मंजुश्री पवार, भरत रसाळे, प्रा. मधुकर पाटील, राजू मालेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.