कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक शौचालय दिनानिमित्त स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवणे, वैयक्तीक शौचालयाचा वापर होणे, तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२२-२३ अंतर्गत विहित कालमर्यादेत कार्यवाही करण्यासाठी ३ नोव्हेंबर २०२२ ते १९ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत विशेष मोहिम जिल्हयात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
यावर्षी जागतिक शौचालय दिन २०२२ साठी “शौचालय आणि भूजल” अशी संकल्पना देण्यात आलेली आहे. या मोहिमेत सर्व ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवुन ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.
१९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक शौचालय दिन राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने जिल्हयातील स्वच्छतेच्या कामास गती देवुन स्वच्छतेचा जागर करावयाचा आहे. स्वच्छतेच्या विविध उद्दिष्टांच्या पूर्ती करिता सूक्ष्म नियोजन करून कामे पूर्ण केली जाणार आहेत. या कालावधीत जिल्हा व तालुका स्तरावर विशेष मोहिम राबविण्यासाठी नियोजन बैठक घेणे, वैयक्तीक शौचालयासाठी ऑनलाईनव्दारे प्राप्त अर्जांवर कार्यावाही करणे, प्रलंबित वैयक्तीक शौचालय बांधकाम पुर्ण करुन प्रोत्साहनपर अनुदान तात्काळ वितरित करणे, एक शोषखड्डा असलेली शौचालय दोन शोषखड्डा मध्ये रुपांतर करणे, ५०० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावात सेप्टीक टँक शौचालयाचे मैला गाळ व्यवस्थापनासाठी चर उपलब्घ करुन देणे, जिल्हयातील सर्व नागरी मैला गाळ व्यवस्थापन सुविधेसोबत १० किलोमीटर परिसरातील ५०० हून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावांना जोडण्यासाठी नियोजन करणे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालय बांधकाम देखभाल व दुरुस्ती करणे, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन प्रकल्प, शोषखडा बांधकाम, प्लास्टीक कचरा व्यवस्थापन प्रकल्प, नादुस्त शौचालय दुरुस्त करणे, यासारखी कामे मोहीम स्वरुपात पुर्ण करणेसाठी जिल्हयातील प्रत्येक गावात स्वच्छतेचा जागर केला जाणार आहे.
या मोहिमेत स्वयंसेवी संस्था, शासकीय विभागांचा सहभाग घेवुन विविध उपक्रमांव्दारे गावांगावांत जनजागृती करणेत येणार आहे. या विशेष स्वच्छता मोहिम कालावधीत ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेवून, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली जाणार आहे. नियोजनपूर्वक कामे करुन जिल्हयात मोहिम प्रभाविपणे राबविण्याबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आली असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.