कोल्हापूर (प्रतिनिधी): व्हेल माशाच्या उलटीची बेकायदा वाहतूक करणार्या तिघांना आज (शुक्रवारी) अटक करण्यात आली आह्रे. स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाने या तिघांना ताब्यात घेतलं आहे. या वाहनधारकांकडून सुमारे साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रदीप भालेराव, शकील शेख आणि आमीर पठाण अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून पोलिसांनी ३ कोटी ४१ लाख ३० हजारांची व्हेल माशाची उलटी, गुन्ह्यात वापरलेली साडेतीन लाख रुपयांची आलिशान कार असा सुमारे ३ कोटी ४४ लाख ६५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. व्हेल माशाची उलटी बेकायदा जवळ बाळगून ती विक्रीसाठी पुणे-बेंगलोर महामार्गावरुन जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने पुणे- बेंगलोर महामार्गावर सरनोबतवाडी येथे सापळा लावत व्हेल माशाची उलटी घेवुन जाणार्या तिघांना ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, उपनिरीक्षक विनायक सपाटे,शेष मोरे,श्रीकांत मोहिते वैभव पाटील,विजय गुरखे, हिंदुराव केसरे,अनिल पास्ते,सोमराज पाटील, प्रदीप पोवार, उत्तम सडोलीकर, रसिक आवळकर, वन विभागाचे रेंज ऑफिसर रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील यांनी केली आहे.
