नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बलात्कार तसंच लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये करण्यात येणाऱ्या कौमार्य चाचणी म्हणजेचं टू फिंगर टेस्ट वर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.

सुप्रीम कोर्टाने तसंच अशा प्रकारची चाचणी करणाऱ्यांना गैरवर्तनाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं आहे. आजही आपल्याकडे कौमार्य चाचणी घेतली जाते हे निंदनीय आहे अशी खंतही कोर्टाने व्यक्त केली.
खंडपीठाने यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला बलात्कार आणि लैंगिक शोषणातील पीडितांची कौमार्य चाचणी घेतली जाणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसंच केंद्र सरकारसह राज्य सरकारांना आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या गाईडलाइन्स सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये पाठवण्याचा आदेश दिला आहे.
खंडपीठाने पीडित महिलांची योग्य चाचणी व्हावी यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचं वर्कशॉप घेण्याचीही सूचना केली. तसंच वैद्यकीय अभ्यासक्रमांची चाचपणी करण्यास सांगितलं आहे. जेणेकरुन बलात्कार किंवा लैंगिक शोषण पीडित महिलांची तपासणी करताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही.