कुलगुरू डॉ.के.प्रथापन यांना एलिट अॅकॅडेमिशियन अवॉर्ड

तळसंदे (प्रतिनिधी) : डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के प्रथापन यांना इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स, नवी दिल्लीतर्फे (आयईईई) “एलिट अॅकॅडेमिशियन अवॉर्ड 2022” ने सन्मानित करण्यात आले.

    

अभियांत्रिकी शिक्षण, ई- जर्नल प्रकाशने, तंत्रज्ञान मानके आणि जागतिक शिक्षण क्षेत्रातील सुधारणा  यासाठी आयईईई  कार्य करते. डॉ.प्रथापन यांनी कृषी शिक्षण क्षेत्रात केरळ कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीचा प्रारंभ केला. केरळ राज्यातील फलोत्पादन क्षेत्राचा विकास, राष्ट्रीय फलोत्पादन मिशन केरळ, केराफेड, हॉर्टीकॉर्पचे संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, केरळ सरकारचे कृषी संचालक म्हणून त्यांनी कृषी विकासात मोठे योगदान दिले आहे. या योगदानाची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून डॉ के प्रथापन ऑगस्ट 2021 पासून कार्यरत आहेत. डी.वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे व्यवस्थापन मंडळ सदस्य म्हणूनही हे काम पाहत आहेत. एफएसएसएआयचे वैज्ञानिक पॅनेल सदस्य, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सदस्य,  ग्रीन क्लायमेट फंड, कोरिया व गाईड पॉईंट अमेरिकाचे ते सल्लागार आहेत.

अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मिळल्याबद्दल डॉ के प्रथापन यांचे कुलपती डॉ संजय डी पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ अनिल कुमार गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.