शाहूवाडीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांबवडे (ता.शाहूवाडी) येथे अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडून शाहूवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय बाळकृष्ण शिंदे (वय ५०, रा.भागाईवाडी, ता.शिराळा, जि.सांगली) असे या संशयित बोगस डॉक्टरचे नाव आहे.

डॉ.हिरालाल निरंकारी यांच्या फिर्यादीनुसार संशयित शिंदे याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम १९६१ चे कलम ३३(२) व ३३ (अ) प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित डॉ.शिंदे याच्याकडे केलेल्या पडताळणीमध्ये अधिकृत वैद्यकीय शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, वैद्यकीय व्यवसायाचा परवाना, कोणताही दस्तऐवज उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. शिवाय याआधीही शिंदे याच्याविरोधात बोगस वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई झालेली आहे. पण यामध्ये फिर्यादीने तक्रार मागे घेतली होती त्यामुळे पुन्हा विश्वास वाढून डॉक्टरी वेशात येऊन कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनात येत आहे .

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोधमोहीम सुरू केली आहे. त्यादृष्टीने प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोगस डॉक्टरांची नांवे व  ठिकाणांची यादी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शाहूवाडी तालुक्यात सात बोगस डॉक्टर अवैधरित्या वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असल्याचे निदर्शनास आले. या सर्वांची चौकशी करून केलेल्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हिरालाल निरंकारी यांना सांगितले आहे.

🤙 9921334545