मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनल केले आहे.
या निवडणुकीसाठी याआधी पवार आणि शेलार गट वेगवेगळे उतरणार होते, पण आता दोघेही एकत्रपण निवडणूक लढवणार असल्याने या निवडणुकीत बरेच कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र मैदानात उतरणार आहेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या यंदाच्या निवडणुकीसाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचं संयुक्त पॅनल असणार असून या पॅनलमधून भाजप, शिवसेना तसंच शिंदे गट असे सारे एकत्र येताना दिसणार आहेत. यावेळी आशिष शेलार अध्यक्षपदासाठी तर अमोल काळे उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तर सचिवपदासाठी अजिंक्य नाईकांची उमेदवारी असून संयुक्त सचिव दीपक पाटील तर खजिनदारपदासाठी अरमान मलिकांना उमेदवारी दिली आहे. कार्यकारिणीत जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, निलेश भोसले यांच्यासह 9 जण असणार आहेत. त्यामुळे विविध पक्षांचे नेते यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी एका पॅनलमधून निवडणुक लढवणार आहेत.