सोशल मीडियाचा अतिरेक टाळा-डॉ.निखिल चौगुले

कसबा बावडा (प्रतिनिधी): सध्याची युवा पिढी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. नकारात्मक विचार, अपराधी भावना यासारख्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे युवा पिढीने सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा,असे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ.निखिल चौगुले यांनी केले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक मध्ये ‘सोशल मीडिया आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुढे बोलताना डॉ.चौगुले म्हणाले की, काही लोकांच्या बाबतीत स्मार्टफोन हा  शरीराचा एक भाग असल्यासारखे झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा घडू शकतात. त्याचा वापर हा योग्य पद्धतीने योग्य वेळेसाठी व्हायला हवा. पण सध्या या माध्यमातून व्हर्च्यूअल जग तयार झाले आहे. प्रत्यक्षात मैत्री करण्यापेक्षा व्हर्च्यूअल मैत्री करण्याकडे युवा पिढीचा कल वाढत आहे. जर या जगात कोणाकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, तर त्यामुळे अस्वस्थता वाढत आहे.

परिस्थिती काहीही असेल तर ऑनलाईन राहणे गरजेचे वाटत आहे. त्यामुळे वागण्यातील समस्या देखील निर्माण होत आहेत.अवतीभोवती काय चालले आहे हे विसरून एकलकोंडेपणा वाढत आहे. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी योगा,प्राणायाम,  व्यायाम या गोष्टीकडे  प्राधान्याने लक्ष द्यायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रथम वर्ष समन्वयक प्रा. बी.जी.शिंदे,असिस्टंट रजिस्ट्रार प्रा सचिन जडगे यांच्यासह स्टाफ उपस्थित होते. प्रा.शिवतेज पाटील यांनी आभार मानले.