पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक आज बुधवारी जाहीर करण्यात आले.
यावेळी तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. २०२३ पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असल्याने उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
या वेळापत्रकात दिवाणी कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२३, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त परीक्षा २०२३ अंतर्गत सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आदी पदांचा समावेश आहे. तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित २०२३अंतर्गत राज्यसेवेअंतर्गत ३३ संवर्गातील पदे, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा, कृषी सहायक आदी पदांचा समावेश आहे. या परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध होण्याचा संभाव्य महिना, पूर्व आणि मुख्य परीक्षांच्या संभाव्य तारखा नमूद करण्यात आल्या आहेत.
वेळापत्रकाबाबत एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे म्हणाले, आयोगाच्या १ ऑगस्ट रोजीच्या प्रसिद्धिपत्रकानुसार २०२३पासून परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. त्यासाठी उमेदवारांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा या दृष्टीने नेहमीपेक्षा तीन महिने आधी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले.