देशभरात ईडी, एनआयएची छापेमारी; कोल्हापुरातून एकाला घेतले ताब्यात

मुंबई : राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने गुरुवारी सकाळी दहा राज्यांमध्ये दहशतवादी वित्तपुरवठा करण्यात सहभागी असलेल्या संशयितांच्या कार्यालय, निवासस्थानावर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, छाप्यांदरम्यान, एनआयए आणि ईडीने दहशतवाद्यांना समर्थन केल्याच्या आरोपाखाली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या सुमारे 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात कोल्हापुरातील एकाचा समावेश आहे.

आतापर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रनेणे २० हून अधिक जणांना ताब्यात घेतले असून कोल्हापूर शहरातील जवाहरनगर आणि इचलकरंजी येथून एकाला पहाटे ताब्यात घेण्यात आले आहे. जवाहरनगर येथील साहिल अपार्टमेंटमधील अब्दुल मौला मुल्ला यांच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. एनआयएने केलेल्या या कारवाईविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. एनआयए ने टाकलेल्या या छापेमारीमुळे बघ्यांची गर्दी खूप जमल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाल्याने राजारामपुरी पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात एटीएसच्या विविध पथकांनी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, मालेगाव (नाशिक जिल्हा) आणि जळगाव येथे छापे टाकले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

ते म्हणाले की, एटीएसच्या पथकांनी राज्यातील विविध ठिकाणांहून किमान 20 जणांना अटक केली आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली.

ते म्हणाले की, एटीएसने मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड येथे भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये चार गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांसंदर्भात एटीएस अधिकारी काही लोकांची चौकशीही करत आहेत.