कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राबविण्यात येणार आहेत. यावर्षी या अभियानात गावांची दृश्यमान (नजरेला दिसून येईल) स्वच्छता ही संकल्पना घेऊन हे अभियान गावागावात राबविण्यात येणार आहे. या कालावधीत महाश्रमदानाव्दारे कचरा,विशेषत: प्लास्टीक कचरा संकलन व व्यवस्थापन करण्याचे नियोजित केले आहे. या मोहीमेत नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हयात शाश्वत स्वच्छता राहावी व आरोग्य संपन्न गावे निर्माण व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार,”स्वच्छता ही सेवा”अभियान अंतर्गत खालील प्रमाणे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२- गावांमध्ये जनजागृती करणे व दृश्यमान (नजरेला दिसून येईल) स्वच्छता राखणे.
१५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२-महाश्रमदान,देशव्यापी स्वच्छता मोहीम, कचरा ठिकाणांची स्वच्छता करणे. विशेषत : प्लास्टीक कचरा संकलन व व्यवस्थान करणे.
२६ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२२- रेल्वे स्थानके, बाजारपेठा, शासकीय दवाखाने, ग्रामपंचायत कार्यालये, मंदिर व मंदिर परिसर, समाज मंदिरे, शाळा,अंगणवाडी इत्यादी ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम घेणे.
२ ऑक्टोंबर २०२२ स्वच्छता दिवस- ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक (ODF Plus) घोषित करणे, ग्रामसभेमध्ये एकदाच वापरावयाचे प्लास्टीक बंदी बाबत ठराव करणे.
या उपक्रमांसोबतच स्थानिक परिस्थितीनुसार पाणी व स्वच्छतेविषयक अन्य कल्पक उपक्रम राबविणे येणार आहेत. यामुळे गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF Plus) होणेसाठी मदत होणार आहे.
या अभियानात लोकप्रतिनिधी, गावातील सरपंच/ सदस्य, गावातील समाजसेवी संस्था व ग्रामस्थ यांनी सहभागी होऊन ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.