जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या; ईडीकडून आरोपींच्या यादीत नाव!

मुंबई : सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणामध्ये बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या आहेत. आरोपींच्या नावाच्या यादीमध्ये आता जॅकलिन फर्नांडिसचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे. ईडी काही महिन्यांपासून सुकेश चंद्रशेखर सोबत संबंधांच्या बाबतीत जॅकलीनची चौकशी करत होती. यामध्ये तिच्या 12 लाख रूपयांची एफडी देखील अटॅच केली आहे.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पहिल्यांदा जॅकलीनच्या नावाची चर्चा झाली. साक्षीदार म्हणून पहिल्यांदा तिचा जबाब नोंदवण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात ईडी ने पिंकी इराणी विरूद्ध सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केली. पिंकीने सुकेशची ओळख जॅकलीन सोबत केली होती. असा आरोप आहे की पिंकी ईरानी जॅकलीन साठी महागडी गिफ्ट्स विकत घेत होती. सुकेशने काही मॉडेल, अभिनेत्रींच्या नावे 20 कोटी लुटले आहेत. काहींनी त्यांच्याकडून गिफ्ट्स घेण्यास नकार दिला.

ईडीने सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि अन्य सहा जणांविरूद्ध 200 कोटी रूपयांची मनी लॉंडरिंग प्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. ईडीचा आरोप आहे की सुकेश जेव्हा तिहार जेल मध्ये होता तेव्हा त्याने रॅनबॅक्सीचा पूर्व प्रमोटर शिविंदर सिंह आणि मालविंदर सिंह याना त्याला तुरुंगातून बाहेर येण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी दोघांच्या पत्नींची 200 कोटींहून अधिकची फसवणूक केली. त्यांनी स्वत:ला कधी पीएमओ, तर कधी गृहमंत्रालयाशी निगडित अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर सुकेशवर गुन्हा दाखल करण्यात आला.