नवी दिल्ली : केवळ दोन-तीन जनावरे घेऊन दूध उत्पादन परवडत नाही अशी तक्रार दूध उत्पादक करताना दिसतात. यासाठी पशुसंवर्धनापासून संकलन, प्रक्रिया, उपपदार्थ निर्मिती, वितरण आणि मार्केटिंग या सर्व टप्प्यावर उपलब्ध साधनांचा पूर्णपणे आणि कौशल्याने वापर करण्याची तसेच भारतातील या पारंपारिक व्यवसायात नाविन्य आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. चेतन नरके यांनी केले.
इंडियन डेअरी असोसिएशनची पहिली बैठक दिल्ली येथील मुख्यालयात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
नरके म्हणाले, गाय किंवा म्हैस याच्या एखाद्या वाणाची क्षमता जर १० लीटर दूध देण्याची असेल आणि प्रत्यक्षात जर कमी उत्पन्न मिळत असेल तर त्यासाठी असलेल्या कारणांचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. आरोग्य आणि आहाराची काळजी घेणे, जनावरासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, रेशन बलेन्सिंग, लसीकरण, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दूध संकलन याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रक्रिया उद्योगात वेळेत दूध संकलन होणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्याचा वापर करत शक्य तिथे खर्च कमी करणे शक्य आहे. दुधाचा आहारातील वापर वाढण्यासाठी प्रक्रिया उद्योगात नाविन्य आणत नवनवीन उपपदार्थांची निर्मिती करावी लागेल. त्याची बाजारपेठ निर्माण करून ग्राहकांना चांगली सेवा ध्यावी लागेल तरच दूध उत्पादकांना चांगला भाव देणे शक्य होणार आहे. यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यापासून, प्रक्रिया संघ यांच्यासह सर्वच घटकांचा सहभाग आणि इच्छाशक्ती महत्वाची आहे. व्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून त्या दूर करणे आणि सर्व क्षमतांचा विकास करणे हा एकमेव पर्याय आहे. यामध्ये शासनाने देखील दुग्ध व्यवसायासाठी आवश्यक पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
यावेळी आयडीए चे माजी अध्यक्ष डॉ. जी. एस. राझोरीया, एन.डी.डी.बी. चे अध्यक्ष मिनेश शाह, आयडीए चे नूतन अध्यक्ष आणि अमुलचे कार्यकारी संचालक आर.एस. सोधी, संचालक रामचरण चौधरी यांच्यासह इतर संचालक उपस्थित होते.