देशप्रेम जागृत व्हावे यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन : समरजीतसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व सर्वांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे.या हेतूने कागल येथे तिरंगा रॅलीचे आयोजन केले. त्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने तिरंगा रॅली ऐतिहासिक ठरली, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी तिरंगा रॅलीचे समारोप प्रसंगी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कागल येथील गैबी चौकापासून ते सिद्धीनेर्ली हायस्कूल पर्यंत या तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते गैबी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा ज्योतिबा फुले, व थोर साहित्यिक आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीस सुरवात झाली. बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पुष्पहार घालून श्री घाटगे यांनी अभिवादन केले. रॅली मार्गावर पिंपळगाव खु !! ,व्हनुर फाटा,खोत मळा येथे देशभक्तांनी रॅलीचे स्वागत केले. सिद्धीनेर्ली हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी रॅलीस मानवंदना दिल्यानंतर रॅलीची सांगता झाली.

रॅलीत राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता समरजीतसिंह घाटगे व युवराज आर्यवीर घाटगे यांच्यासह महिला बाईकस्वार यांचा सहभाग लक्षवेधी ठरला.भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मोटरसायकलला लावलेल्या तिरंगा ध्वजामुळे वातावरण तिरंगामय झाले होते. जवळपास नऊशेहून अधिक बाईकस्वारानी या रॅलीमध्ये सहभाग घेतला. कागल मध्ये प्रथमतः निघालेली तिरंगा रॅली ऐतिहासिक ठरली.