कोल्हापूर : अलीकडच्या काळात पालकांकडून मुलांबद्दल अपेक्षा वाढत आहेत. प्रत्येकजण समाधान मिळावे म्हणून पैशाच्या मागे धावत आहे. पण समाधान हे संपत्तीवर अवलंबून नसते. आयुष्यामध्ये एक लक्ष्य ठरवून करियर निवडावे व त्या करिअरमध्ये एव्हरेस्ट सर करण्यासाठी कष्ट घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन जगातील सर्वात लहान एव्हरेस्टवीर कस्तुरी सावेकर हिने केले.

जिल्हा एड्स नियंत्रण पथक सीपीआर हॉस्पिटल च्या वतीने सायबर कॉलेज येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी युथ आयकॉन म्हणून ती बोलत होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख (देसाई) अध्यक्ष स्थानी होत्या. सायबर चे संचालक डॉ. एस. पी. रथ, जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, समाजकार्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. दीपक भोसले प्रमुख उपस्थित होते.

पुढे बोलताना कस्तुरी सावेकर म्हणाली, शाहूनगरीत जन्माला आले याचा मला अभिमान आहे. या करवीर नगरीचा झेंडा एव्हरेस्टवर रोवावा हे माझे स्वप्न होते. माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून प्रोत्साहन दिले. अत्यंत खडतर परिस्थितीत खंबीरपणे माझ्या मागे उभे राहिले त्यामुळेच माझे ध्येय मी साध्य करू शकले. पालकांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील अत्युच्च शिखरावर जाण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. जी गोष्ट आपण करणार ती का करतोय या मागचा ‘ का ‘ स्पष्ट झाला तरच यशाचे एव्हरेस्ट गाठता येणार आहे. एच आय व्ही च्या बाबतीतही तरुणांनी सतर्क राहायला हवे व त्याबाबतीत जनजागृती केली पाहिजे’.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख (देसाई) म्हणाल्या कोल्हापूर ही शूर व पराक्रमी लोकांची भूमी आहे. युवकांनी त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्चपदी पोहोचून युथ आयकॉन म्हणून बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
प्रास्ताविकामध्ये जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर म्हणाल्या, ” पिढीजात ऐक्य ठेवू , आपल्या मुलांना अधिक चांगले जग निर्माण करू”हे या वर्षीच्या युवा दिनाचे ब्रीदवाक्य असून पिढ्यांमधील अंतर कमी व्हावे, संवाद वाढावा जेणेकरून मुलांचे भविष्य सक्षम होईल. असे आढळून येते की, 15 ते 49 या वयोगटामध्ये एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी अधिक आहे. युवकांनी एचआयव्ही उच्चाटनासाठी 360 डिग्री म्हणजे सतत कार्यान्वित राहिले पाहिजे.
सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी, तर आभार मकरंद चौधरी यांनी केले. यावेळी जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे, तांत्रिक अधिकारी पूजा पाटील,राहुल मोटे उपस्थित होते.
