भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद

गगनबावडा : कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या भुईबावडा घाटामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे.

भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या घाट मार्गाला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.दरड कोसळल्याने गगनबावडा चौकात बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान, करुळ घाटातून हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरु आहे. यासंदर्भात गगनबावडा पोलीस ठाण्याकडून माहिती देण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. आज सकाळी शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये भूस्खलन झाले होते. मात्र, दोन तासांमध्ये प्रशासनाने तातडीने कार्यवाही करताना रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता. त्यामुळे आता त्या मार्गावरून वाहतूक पूर्ववत झाली आहे.